जिल्हास्तरीय  पौष्टिक तृणधान्य दिन संपन्न

  जिल्हास्तरीय  पौष्टिक तृणधान्य दिन संपन्न
           आज दिनांक १४-१-२०२३ रोजी मकर संक्रांति – भोगी निमित्त पौष्टिक तृणधान्य दिन कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा व कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांचे संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. 
        सदर कार्यक्रमाची सुरुवात हरितक्रांतीचे प्रणेते स्व. वसंतरावजी नाईक व भारताचे माजी कृषिमंत्री तथा विद्या महर्षी स्व. भाऊसाहेब जी देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री नवनाथ कोळपकर उपस्थित होते.
    सदर कार्यक्रमाचे सुरुवातीला अनिल राठी कृषी अधिकारी यवतमाळ यांनी पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यामागची शासनाची भूमिका समजावून सांगितली तसेच पौष्टिक तृणधान्याच्या दृष्टीने शासनाचे धोरण याविषयी आपल्या संभाषणातून प्रकाश टाकला. तृणधान्याचे आहारातील महत्त्व, यवतमाळ जिल्ह्यामध्ये पौष्टिक तृणधान्य पिकाखाली असलेल्या पिकाचे क्षेत्र, पौष्टिक तृणधान्य पिकांतर्गत ज्वारी पिकाचे क्षेत्र वाढ करण्याचे दृष्टीने नियोजन याविषयी माहिती दिली.
     तालुका कृषी अधिकारी यवतमाळ श्री राजेंद्र फाळके यांनी ज्वारी तसेच बाजरी या पिकाविषयी माहिती दिली तसेच उपस्थितांना आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा वापर वाढविणे विषयी आवाहन केले.
      तंत्र सल्लागार श्री देवानंद खांदवे यांनी प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगाविषयी व त्याद्वारे पौष्टिक तृणधान्याचा वापर करून अन्नप्रक्रिया उद्योग उभारणे याविषयी मार्गदर्शन केले.
        श्रीमती  स्नेहलता  भागवत विषय विशेषज्ञ गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ यांनी सादरीकरणाद्वारे सर्व प्रकारच्या पौष्टिक तृणधान्याची माहिती दिली तसेच सर्व प्रकारच्या तृणधान्याची ओळख शेतक-यांना होण्याचे दृष्टीने नमुने दाखविले.पौष्टिक तृणधान्याचे मूल्यवर्धन करून त्यापासून तयार करण्यात येणाऱ्या विविध वस्तू याविषयी माहिती देऊन मानवाच्या आहारातील पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व विषद केले.
        कार्यक्रम समन्वयक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ डॉक्टर सुरेश नेमाडे यांनी यवतमाळ जिल्ह्यामध्ये पोष्टिक तृणधान्य अंतर्गत घेण्यात येणारे ज्वारी व बाजरी या पिकाचे अद्यावत लागवड तंत्रज्ञान याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ज्वारी व बाजरी या पिकाचे इतर पिकाच्या तुलनेत अर्थकारण समजावून सांगितले.

         कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपस्थित असलेले जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा श्री नवनाथ कोळपकर यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्य वर्ष साजरे करण्यामागचा उद्देश, पौष्टिक तृणधान्याचा आहारातील वापर वाढविणे, प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आधारे पौष्टिक तृणधान्यावर प्रक्रिया उद्योगाची निर्मिती करून विविध उत्पादने तयार करण्याविषयी प्रकल्प सादर करणे याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
   कार्यक्रमांमध्ये उपस्थित सर्व शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्यापासून बनविलेला आहार नाचणीचा शिरा, पापड व  बाजरीची भाकरी इत्यादीचा समावेश भोजनात करण्यात आला..
शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ

Learn More →