मिलेटस…

भरड धान्य किंवा कदन्न (IPAc-en: ˈmɪlɪts; उच्चार:मिलेट्स)[१] हा लहान-बीज असलेल्या तृण वर्गीय पिकांचा एक अत्यंत वैविध्यपूर्ण गट आहे, जो जगभरात जनावरांचा चारा आणि मानवी अन्नासाठी धान्य म्हणून मोठ्या प्रमाणावर पिकवला जातो. साधारणतः भरड धान्ये ही आकाराने बारीक, गोलाकार तसेच खाण्यासाठी जशीच्या तशी वापरता येतात. त्याला विशेष प्रकारची शुद्धता किंवा कोणतीही विशेष प्रक्रिया करण्याची गरजच नाही. सामान्यतः भरड धान्य किंवा मिलेट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बहुतेक प्रजाती Paniceae या जमातीच्या आहेत, परंतु काही इतर विविध जमातीच्या देखील आहेत.[२]

भरड धान्यास श्रीअन्न देखील म्हटले जाते. पूर्वीच्या काळी उखळ आणि मुसळ वापरून या धण्यावरील साल/साळ किंवा कवच भरडून काढले जात असे. त्या नंतर याचे गरजेनुसार जात्यावर दळून पीठ देखील केले जात असे. यामुळे या धान्याला भरड धान्य असे म्हटले जात असे. देश स्तरावरील बहुतेक शेतकरी खाण्यासाठी ही धान्ये विशेष करून पिकवत असे.[३] ज्वारी आणि बाजरी ही साधारणतः आकाराने मोठी असलेली धान्ये असून त्यांना ‘ग्रेटर मिलेट’ म्हणतात. तर आकाराने बारीक असलेली नाचणी, वरी, राळा, कोदो, बर्टी, प्रोसो व ब्राऊनटौप ही सर्व ‘मायनर मिलेट’ किंवा ‘बारीक धान्ये’ म्हणून ओळखली जातात. तर राजगिरा आणि बकव्हीट (कुट्टू) यांना ‘स्यूडो मिलेट्स’ किंवा ‘छद्म भरड धान्य’ असे म्हणतात.[४][५]

भरड धान्य ही आशिया आणि आफ्रिकेच्या अर्ध- उष्ण कटिबंधातील; विशेषतः भारतमालीनायजेरिया आणि नायजर मधील महत्त्वाची पिके आहेत. ज्यात विकसनशील देशांचा जागतिक उत्पादनाच्या ९७% वाटा आहे. [६] कोरड्या, उच्च-तापमानाच्या प्रतिकूल परिस्थितीत त्याची उत्पादकता आणि वाढीसाठीचा छोटा हंगाम यामुळे हे पीक फायदेशीर आहे.

जगाच्या अनेक भागांमध्ये भरड धान्य हे स्थानिक पीक आहे.[७] ज्वारी आणि बाजरी ही भारत आणि आफ्रिकेच्या काही भागातील महत्त्वाची पिके असून, सर्वात मोठ्या प्रमाणावर उत्पादित केली जातात.[८] त्याव्यतिरिक्त नाचणीवरी आणि राळे याही भरड धान्याच्या काही महत्त्वाच्या प्रजाती आहेत.

भरड धान्ये सुमारे ७,००० वर्षांपासून मनुष्य प्राण्याच्या आहारातील एक मुख्य धान्य असावे आणि संभाव्यतः बहु-पिक शेती आणि स्थिर शेती सोसायटीच्या वाढीमध्ये त्यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती.[९]

सामान्यतः, भरड धान्य हे तृणवर्गीय कुटुंबातील लहान-दाणेदार, वार्षिक, उबदार हवामानातील तृणधान्ये असतात. ते दुष्काळ, रोग आणि इतर अत्यंत विपरीत परिस्थितीला उत्तम सहनशील असतात. याशिवाय इतर प्रमुख तृणधान्यांइतकेच यात पोषक घटक असतात.[१०]

भारतातून संयुक्त अरब अमिरातीनेपाळसौदी अरेबियालिबियाओमानइजिप्तट्युनिशियायेमेनयु.के. आणि अमेरिका या प्रमुख देशांमध्ये भरड धान्ये निर्यात होतात. यात बाजरी, नाचणी, कांगणी, राळे, वरी, राजगिरा ज्वारी आणि कुट्टू (बकव्हीट) हे भारतामधून निर्यात होणाऱ्या भरड धान्यांचे विविध प्रकार आहेत.तर इंडोनेशिया, बेल्जियम, जपान, जर्मनी, मेक्सिको, इटली, यू.एस.ए., युनायटेड किंगडम, ब्राझील आणि नेदरलँड्स हे प्रमुख देश इतर विविध देशातून भरड धान्ये आयात करतात.

भारत सरकार द्वारा निर्मित भारतीय भरड धान्ये संशोधन संस्था (ICAR-IIMR) ही राजेंद्रनगर (हैदराबाद, तेलंगणा, भारत) येथे ज्वारी आणि इतर भरड धान्यावरील मूलभूत आणि धोरणात्मक संशोधन करणारी एक कृषी संशोधन संस्था आहे. ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (ICAR) अंतर्गत कार्यरत आहे.[११] भरड धान्याचे प्रजनन, सुधारणा, पॅथॉलॉजी आणि मूल्यवर्धन यावर ही संस्था कृषी संशोधन करते. या संस्थेची स्थापना १९५८ मध्ये प्रथम कापूस, तेलबिया आणि भरड धान्य (PIRCOM) वरील गहन संशोधन प्रकल्पांतर्गत करण्यात आली. २०१४ मध्ये ही संस्था ‘भा कृ स प – भा भ धा सं सं’ म्हणून श्रेणीसुधारित करण्यात आली आहे.[१२]

शेअर करा...

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जळगाव

Learn More →