आंतराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ क्रॉपसॅप प्रशिक्षणात जिल्हास्तरीय प्रचार प्रसिद्धी कार्यशाळा यवतमाळ

संयुक्त राष्ट्रसंघाने २०२३ हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले. त्यामुळे या पिकांनी साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे. अन्य देशांसोबत भारतानेच हा प्रस्ताव राष्ट्रसंघापुढे ठेवला होता. ज्वारी, बाजरी, नाचणी, कोडो, कुटकी ही आपली पारंपरिक तृणधान्ये आहेत.या पिकांची उत्पादकता कमी आहे. मात्र शेतकऱ्यांना या पिकांकडे पुन्हा वळवायचे असेल तर त्यांच्यातील औषधी व पौष्टिक गुणधर्मांबाबत अधिक प्रबोधन आवश्‍यक आहे. पदार्थांचे मूल्यवर्धन महत्त्वाचे आहे. देशात शहरीकरणाचा वेग मोठा आहे. शहरी लोकांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदलत आहेत. त्यातून मधुमेह, उच्च रक्तदाब व लठ्ठपणा असे विकार वाढत आहेत. त्यामुळे भरडधान्यांपासून बनवलेले पदार्थ पचायला हलके व पौष्टिक असल्याने शहरांत त्याविषयी जागरूकता वाढवण्याची गरज आहे. ग्राहक वाढला तर त्याचा थेट फायदा शेतकऱ्यांना होईल. परिणामी, या पिकांखालील क्षेत्र व उत्पादकता वाढ साध्य होईल.मूल्य साखळी विकास करणे हा महत्त्वाचा उपाय आहे. शेतकऱ्यांच्या उत्पादक कंपन्या स्थापन करणे, त्यांना मूल्यवर्धनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देणे, ब्रॅण्ड निर्मिती करणे अशा मुद्द्यांवर काम करता येऊ शकते. शाळांमधील माधान्य न्याहारी योजनेत या पदार्थांचा समावेश करणे, शासनामार्फत हमीभावाने खरेदी, सार्वजनिक वितरण प्रणालीत वितरण या बाबीही महत्त्वाच्या आहेत. ओरिसा शासनाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पौष्टिक तृणधान्ये आणली आहेत. ज्या पद्धतीने दुधाचा व अंड्याचा वापर वाढविण्यासाठी जाहिरात केली जाते तेच तंत्र या पिकांबाबत वापरायला हवे. या पिकांमधील औषधी व पोषण गुणधर्माची जाहिरात केल्यास मागणी वाढू शकते. देशात धवल क्रांती, नील क्रांती, फलोत्पादन क्रांती झाली तशी पौष्टिक तृणधान्यांचीही क्रांती होण्याची गरज आहे. अशी माहिती जिल्हास्तरीय क्रॉपसॅप प्रशिक्षणात देण्यात आली.

शेअर करा...

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, यवतमाळ

Learn More →