सन 2023 हे वर्ष संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीने आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. यानिमित्ताने साक्री तालुक्यातील विविध गावांमध्ये तालुका कृषी अधिकारी सी के ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यामध्ये शाळा, कॉलेज, आश्रमशाळा, ग्रामपंचायत, नगरपंचायत, सामाजिक संस्था, विविध धार्मिक संस्था शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी गट महिला बचत गट, विविध प्रगतशील व पुरस्कार विजेते शेतकरी आणि कृषी विभागाचे सर्वच अधिकारी कर्मचारी यांच्या माध्यमातून पौष्टिक तृणधान्य उत्पादनवाढ व पौष्टिकोन धान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले जात आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून मंडळ कृषी अधिकारी तानाजी सदगीर यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी विभागाच्या वतीने आज मौजे धवळीवीहीर तालुका साक्री येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व ग्रामपंचायत, ग्रामस्थांच्या सहकार्याने रॅली काढून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी सहाय्यक विकास गावित व आत्माचे सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक राहुल पाटील यांनी उपस्थितांना पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी धवळीविहीर गावचे सरपंच प्रभावती मदन अहिरे, उपसरपंच विजय चौधरी, जिल्हा परिषद शाळा मुख्याद्यापक श्री पाटिल सर यांचीही उपस्थिती होती. पौष्टिक तृणधान्यासोबतच प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया योजना, मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरण योजना यासोबतच कृषी विभागाच्या विविध योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन यावेळी कृषी विभागातर्फे करण्यात आले.