पौष्टिक तृणधान्याचे आरोग्यासाठीचे पारंपारिक महत्व आहे. या मध्ये प्रामुख्याने ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राळा, कोदो, सावा व राजगिरा इ. यांचा समावेश होतो. शेतीचे बदलते स्वरूप व नगदी पिके घेण्याचा कल यामुळे सदर पौष्टिक तृणधान्य ही मागे पडली. परंतु बदलती जीवन शैली व वाढणारे विविध आजार लक्षात घेता संयुक्त राष्ट्रसंघाने पौष्टिक तृणधान्य यांचे महत्व ओळखून २०२३ हे वर्ष आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून जाहीर केले आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी उस्मानाबाद यांचे वतीने संपूर्ण जिल्ह्यात पौष्टिक तृणधान्य यांचा वापर आहारात तसेच लागवडीलायक क्षेत्रात वाढ व्हावी म्हणून शेतकरी व नागरीक यांच्यात जागरुकता आणण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत.
दिनांक १२/०१/२०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा कार्यकारी समितीची सभा व पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ संदर्भात कार्यशाळा मा. जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सदर सभेत जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विलास जाधव जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी श्री. महेश तीर्थकर व जिल्हा कार्यकारी समिती चे सर्व सदस्य उपस्थित होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ ची संकल्पना उदिष्टे व वर्षात साजरे करावयाचे कार्यक्रम तसेच उपक्रम याबाबत माहिती दिली. तसेच विविध शासकीय विभागांनी मिळून सर्व सामान्य जनतेच्या आहारात पौष्टिक तृणधान्याचे प्रमाण वाढविण्याबाबत प्रयत्न करावे असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. विलास जाधव यांनी पौष्टिक तृणधान्याचे आहारातील महत्व समजवून सांगितले. तसेच उपस्थितांना आपल्या परिसरातील मित्रांना नातेवाईक यांना आपल्या आहारात पौष्टिक तृणधान्याचा अवश्य वापर करावा असे आवाहन केले.
या कार्यशाळेत आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ बाबत माहितीपर भित्तीपत्रकाचे विमोचन करण्यात आले. तसेच पौष्टिक तृणधान्य आहारात घेण्याबाबत शपथ व त्या बद्दल माहितीच्या सेल्फी पॉइंट चे अनावरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यशाळेस उपस्थित मान्यवर अधिकारी कर्मचारी यांचे आभार श्री. एस. पी. ढोणे यांनी मानले.