वर्धा जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय पौष्टीक तृणधान्य वर्ष 2023 चे जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या माध्यमातून शुभारंभ ”*


दिनांक 24/12/2022 रोजी जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, वर्धा कार्यालयाच्या प्रांगणात आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षाचा शुभारंभ जिल्हास्तरीय कार्यशाळेच्या माध्यमातून करण्यात आला आहे.


      कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. राहुल कर्डिले, (भा.प्र.से.) जिल्हाधिकारी वर्धा, यांचे शुभ हस्ते करण्यात आले. अध्यक्षीय/ उद्घाटनपर संबोधनात त्यांनी तृणधान्यावर प्रक्रिया करून विविध पदार्थ तयार करता येतील त्याचबरोबर सदर प्रक्रिया उद्योगांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया (PMFME) योजने अंतर्गत अनुदानही घेता येईल, असे सांगितले.


कार्यक्रमाचे प्रास्ताविकपर संबोधनात डॉ. विद्या मानकर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा, वर्धा यांनी जागतिक अन्न व कृषी संघटनेने “सन 2023 वर्ष हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष” म्हणून घोषित केल्याचे नमूद करून याच पार्श्वभूमीवर वर्धा जिल्ह्यामध्ये सन 2023 या संपूर्ण वर्षांमध्ये निरनिराळे कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत.

सध्याच्या धकाधकीच्या युगामध्ये बदलत्या जीवनमानामुळे विविध रोगांचे विशेषतः हृदयरोग मधुमेह व पोटांचे विकार चे प्रमाण वाढलेले दिसून येत आहेत. त्यामुळे आहारामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर व राजगिरा अशा तृणधान्यापासून बनलेल्या पदार्थांचे महत्त्व सुद्धा वाढू लागले आहे. त्यातच तृणधान्य पिकाखालील क्षेत्रात झालेली घट व शेतकऱ्यांची तृणधान्य पिके लागवडी बाबतची अनास्था,

यावर उपाययोजना तृणधान्य पिके रुक्ष जमिनीवर व कमीतकमी लागवड खर्चासह वाढू शकतात तसेच प्रतिकूल व बदलत्या हवामान परिस्थितीत लागवडीसाठी त्यांची योग्यता असल्यामुळे या पिकांच्या क्षेत्रात वाढ करून अन्न सुरक्षा, पोषण सुरक्षा व शाश्वत उपजीविके करीता पौष्टिक तृणधान्या बाबत  सविस्तर माहिती देऊन पुढील वर्षभरातील कार्याक्रमाची थोडक्यात रूपरेषा मांडली.


जिल्हास्तरीय कार्यशाळेचे प्रमुख अतिथी म्हणून  श्री. राजेंद्र साबळे, विभागीय कृषि सहसंचालक नागपूर विभाग, नागपूर यांनी आपल्या मार्गदर्शनात शेतीपूरक व्यवसाय व कृषि विभागाच्या योजना याबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच डॉ. आकाश लोहकरे (हृदयरोगतज्ञ)  आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मे.) वर्धा यांनी हृदयाचे आरोग्य विशेषतः तरुण मुलांमध्ये सुद्धा हृदय रोगाचे वाढते प्रमाण आणि ते कमी करण्यासाठी पौष्टिक तृणधान्याचे महत्व आपल्या अनुभवातून उपस्थितांना विषद केले.

महात्मा गांधी आयुर्वेद कॉलेजच्या (आयुर्वेदाचार्य) डॉ. पुनम सावरकर यांनी पौष्टिक तृणधान्य ज्वारी, बाजरी, नाचणी, राळा, भगर इ. चे आहारात असणारे महत्व तसेच त्यापासून शरीराला मिळणारी पोषण मुल्ये, शरीरातील दोष याबाबत सविस्तर माहिती उपस्थितांना दिली.

त्यानंतर श्रीमती राखी कलंत्री (आहारतज्ञ) आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय, सावंगी (मे.) वर्धा यांनी ज्वारी, नाचणी, भगर इत्यादी तृणधान्यापासून बनविण्यात येणाऱ्या विविध पदार्थांची माहिती देतांना शाळकरी मुलांनासुद्धा हे पदार्थ देण्यात यावे, जेणेकरून मुलांचा शारीरिक विकास होण्यास मदत होईल असे आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.


त्याचबरोबर वर्धा जिल्ह्यातील सर्व अशासकीय संस्थांचे (NGO) प्रतिनिधी म्हणून श्री. अतुल शर्मा (सचिव, ग्राम सेवा संघ) यांनी तृणधान्य लागवडीच्या अनुषंगाने शेतकऱ्यांना येणारे प्रश्न लक्षात घेता शासन स्तरावर धोरणात्मक निर्णय घेऊन तृणधान्यापासून मिळालेले उत्पादन सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली द्वारे वितरीत केल्यास शेतकऱ्यांना त्याचा जास्त फायदा होईल व पर्यायाने तृणधान्य पिकाच्या लागवडी मध्ये सकारात्मकता निर्माण होईल असे सांगण्यात आले. डॉ. जीवन कतोरे (कार्यक्रम समन्वयक) कृषी विज्ञान केंद्र, सेलसुरा यांनी तृणधान्य लागवड व व्यवस्थापना बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

यानंतर धरामित्र संस्थेच्या श्रीमती रुपल वाघ (आहार तज्ञ) यांनी तृणधान्यापासून बनवण्यात येणारे विविध पदार्थ, त्याचे आहारातील महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली. तर, श्री. अनिकेत लिखार (जिल्हा समन्वयक) ओडीसा राज्यात ‘ ओडीसा मिलेट मिशन ‘ मध्ये प्रत्यक्ष काम केले असुन तेथील अनुभव सांगताना सर्वप्रथम ओडीसा राज्यात 7 तालुक्यात  या मिशन ची सुरुवात केली.

अंमलबजावणी दरम्यान उद्भवलेल्या अडचणींचे निराकरण करून 2022 पर्यंत 19 जिल्ह्यातील 142 तालुक्यात हे मिशन यशस्वीपणे राबविण्यात आले व पिक लागवडी पासून तर शेतमाल बाजारात विक्री करेपर्यंत या मिशन अंतर्गत काम करण्यात येते. ओडीसा मिशन मध्ये शासन, स्वयंसेवी संस्था, महिला बचत गटामार्फत काढणी पश्चात यंत्राचा वापर करून अन्न प्रक्रिया आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत उत्पादित तृणधान्याची खरेदी करून सार्वजनिक धान्य वितरण प्रणाली द्वारे वितरीत करून तसेच शालेय पोषण आहारात तृणधान्याचा वापर करण्यात आला.

त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळाला त्याचबरोबर संशोधनात्मक काम करणाऱ्या संस्था यांच्या सहभागामुळेच हे मिशन ओडिशा राज्यात यशस्वी झाले असेसुद्धा नमुद केले. याप्रमाणे आपल्या जिल्ह्यात सुद्धा नियोजनबद्ध पद्धतीने मिशन स्वरुपात राबविल्यास तृणधान्याचे महत्व व उत्पादन वाढेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सदर कार्यशाळेचे सूत्र संचालन श्रीमती रश्मी जोशी, तंत्र अधिकारी तर आभार श्री परमेश्वर घायतीडक, जिल्हा गुणवत्ता नियंत्रक अधिकारी, वर्धा यांनी मानले.

शेअर करा...