कागल - आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2023 निमित्त कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांचे मार्फत मौजे म्हाकवे येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य शेतकरी संवाद कार्यशाळा तसेच रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिक भेटीचे आयोजन करण्यात आले. यावेळी म्हाकवे परिसरातील शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक विस्तार व प्रशिक्षण कृषी आयुक्तालय पुणे चे संचालक विकास पाटील, विभागीय कृषी माजी सहसंचालक सप्रे, अधीक्षक कृषी अधिकारी उमेश पाटील, विभागीय कृषी सहसंचालक कार्यालय कोल्हापूर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, सरपंच सुनीता चौगुले, बानगे चे माजी सरपंच रमेश पाटील उपस्थित होते.
पौष्टिक तृणधान्यांचे महत्त्व समजावून सांगताना विकास पाटील यांनी पौष्टिक तृण धान्य पिकांना असणारे महत्त्व, आरोग्याच्या दृष्टीने आहारातील महत्त्व, भविष्यातील पौष्टिक तृणधान्यांच्या आयात निर्यात धोरणाविषयी उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर मार्गदर्शन केले.
कृषी विभागातील विविध योजनांची सांगड घालून पौष्टिक तृणधान्यावर आधारित प्रक्रिया उद्योगांना असणारी संधी याबद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान योजनेमधून रब्बी ज्वारी, नाचणी पिकांचे सुधारित बियाणे व इतर निविष्ठा प्रात्यक्षिकामधून उपलब्ध करून, तंत्रज्ञानाचा वापर करून, उत्पादकता वाढवणे विषयी आवाहन केले.
महाडीबीटी अंतर्गत विविध योजनेमधून शेतकऱ्यांना लाभ दिलेल्या ट्रॅक्टर व ट्रॅक्टरचलित अवजारांची पाहणी केली व इतर शेतकऱ्यांनी ही लाभ घेणे बाबत आवाहन केले.
यावेळी म्हाकवे येथील बाबुराव दादू पाटील, विठ्ठल पाटील यांचे रब्बी ज्वारी पीक प्रात्यक्षिकास व ऊस पाचट व्यवस्थापन प्रात्यक्षिकांस भेट दिली.
या कार्यक्रमाचे नियोजन अरुण भिंगारदेवे, तालुका कृषी अधिकारी कागल, राजू मासाळ मंडळ कृषी अधिकारी कागल, सुभाष कोईगडे कृषी पर्यवेक्षक कागल यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिकेत माने मंडळ कृषी अधिकारी कापशी यांनी केले. या कार्यशाळेस कृषी विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी तसेच परिसरातील सर्व शेतकरी उपस्थित होते.